कर्ज (Loans)व्यवसाय (Business)

दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती (Dairy Farming Loan Information in Marathi)

डेअरी फार्मिंग लोनचा (Dairy farming loan) सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात लागणाऱ्या निधीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे आणि या सोबतच एकूण दुग्ध उत्पादन वाढवणे. शेतकरी आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचावून उंचावणे. डेअरी फार्मिंग म्हणजेच गाय म्हैस यांच्यासारख्या दुभत्या जनावरांचा सांभाळ करून त्यांच्यापासून दूध आणि इतर दुधाचे पदार्थ जसे की दही (curd), चीज (cheese), बटर(butter), पनीर यांसारखे पदार्थ तयार करून आपले उत्पन्न वाढवणे.

जनावरांच्या शेणापासून उत्तम प्रकारचे शेणखत (compost) तसेच बायोगॅस निर्मिती (biogas production) सुद्धा करता येईल आणि या शेणखताचा आपण आपली जमीन सुपीक बनवून चांगले उत्पन्न घेऊ शकता. बायोगॅस आपण स्वयपांकासाठी, वीजनिर्मितीसाठी किंवा दुधावर प्रक्रिया करताना इंधन म्हणून वापरू शकता. शासनाच्या दृष्टीने पण दुग्ध उत्पादनाला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळेच शासनाने दुग्ध क्रांती (White Revolution) ची सुरुवात केली ज्यालाच ऑपरेशन फ्लड (Operation Flood) हे नाव दिले.

Importance of Milk and Milk Products

दुध व दुग्धजन्य पदार्थाचे आपल्या आयुष्यातील महत्व (Importance of Milk and Milk Products)

Table of Contents

स्वच्छ व सकस दुध आणि इतर दुग्धजन्य पदार्थाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व हे कुणालाही वेगळे सांगायची आवश्यकता नाही. तरीही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांसाठी दुग्ध उत्पादनातून मिळणारा पैसा हा छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. दिवसेंदिवस शेतीचे कमी होत चाललेले क्षेत्र आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं घटत चाललेलं उत्पन्न याला पर्याय म्हणून दूध आणि दुग्ध पदार्थ पासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांना वाढवण्याची गरज आहे. असेही शेतीतून मिळणारे जे उत्पन्न आहे ते वर्षाकाठी मिळते किंवा त्या पिकाच्या हंगामाच्या शेवटी मिळते. म्हणजेच वर्षातून एक किंवा दोन वेळा हे उत्पन्न मिळते त्यामुळे हे शेतीमधून येणारे उत्पन्न हाती पडेपर्यंत शेतकऱ्याला लागणारा रोजच्या खर्चासाठी ज्या रकमेची आवश्यकता असते त्या रकमेची तजवीज या दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून होऊ शकते होऊ शकते.

ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांनीच जर दुग्ध व्यवसाय (Dairy Business) आणि दुधापासून तयार करणाऱ्या विविध प्रोडक्टचा व्यवसाय (Milk Processing) चांगल्या पद्धतीने केला आणि त्यांच्यातून त्यांना चांगले उत्पन्न होत राहिले तर त्यांची शहरांकडे येणारे लोंढे कमी होतील. त्यांना त्यांच्या भागामध्ये उत्पन्नाचा हक्काचा स्रोत मिळून जाईल. या दुधाच्या वितरणामध्ये आणि दुधाच्या प्रोसेसिंग मध्ये आणि यांच्या विविध तयार केलेल्या पदार्थांच्या वितरण व्यवस्थेमध्ये (Milk and milk product distribution) मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये दूध हे प्रथिनांचे नैसर्गिक आणि सर्वोत्तम स्त्रोत आहे (Rich Source of Proteins).

दुग्धव्यवसायातील संधी (Scope in Dairy Farming Business)

दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात मोठ्या संधीचा विचार करताना आपल्याला अभिमान वाटला पाहिजे कारण भारत हा जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे. तरीही आज भारतामध्ये 232 ग्रॅम प्रतिदिवस एवढेच दुधाचे उत्पन्न होत आहे परंतु भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये लोकांच्या आहारासाठी आणि विशेष करून पौष्टिक आहारासाठी 250 ग्रॅम प्रतिदिवस दुधाची आवश्यकता आहे. आपल्याला जरी हा काही ग्रामचा फरक वाटत असेल तरीही देश पातळीवर हा खूप मोठा फरक आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय तयार झाले पाहिजेत आणि त्यांच्या मधून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचे दूध निर्मिती आणि दुधापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती झाली पाहिजे.

तांत्रिक गोष्टी (Technical Aspect)

डेअरी फार्मिंग प्रकल्प (Dairy Farming Project) सुरू करताना काही तांत्रिक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जसे की, आपल्या एरियामध्ये उच्च प्रतीच्या दुध देणाऱ्या जाती (High Yielding Variety) उपलब्ध आहेत किंवा नाही. आपल्या एरियामध्ये अशा प्रकारच्या जाती उपलब्ध नसतील तर आपण ज्या एरियातून या जाती आणणार आहात तर त्या जनावरांच्या जाती आपल्या वातावरणात तग धरतील का याची सर्वात प्रथम पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच आपण जास्त लांबून जर जनावरं खरेदी करणारा असाल तर आपल्याला होणारा वाहतूक खर्चही (Transportation Cost) विचारात घ्यावा लागणार आहे. वाहतूक खर्चामुळे आपला एकूण खर्च मर्यादेपेक्षा वाढणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.

आपण आपल्या गोठ्यासाठी कोणतीही जातीची निवड करताना ती जनावरे सरासरी किती दूध देतात आणि किती काळ दूध देतात याची शहानिशा करणे गरजेचे आहे. आपल्या भागामध्ये दुभत्या जनावरांना चारा उपलब्ध आहे का जसे की हिरवा चारा (Green Fodder), पेंड (Concentrates) किंवा कोरडा चारा (Dry Fodder) अशा प्रकारचा चारा उपलब्ध असणे गरजेचे आहे.

जनावरांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असायला हवे तसेच आपण जो गोठा बांधणार आहात त्या जनावरांसाठी प्रशस्त असला पाहिजे प्रशस्त म्हणजे तांत्रिकदृष्ट्या एक जनावराला गाय किंवा म्हैस याच्यासाठी चाळीस स्क्वेअर फुट प्रति जनावर (40 square feet per animal) एवढी गोठ्यामध्ये जागा उपलब्ध असली पाहिजे त्यासोबतच शेणखत टाकण्यासाठी, चारा ठेवण्यासाठी, पाणी ठेवण्यासाठी अशा विविध जागांची व्यवस्था आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये करावी लागणार आहे.

आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये काम करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ असणे गरजेचे आहे आपण स्वतः किंवा आपल्या घरातील सदस्य हे काम करण्यासाठी पुरेशी आहेत का किंवा बाहेरील मजूर लागणार असतील तर त्यांना या कामाचा अनुभव असला पाहिजे. तसेच आपण ज्या भागांमध्ये हा डेअरी फार्मिंग प्रकल्प (Dairy Farming Project) उभारणार आहात तर त्या भागामध्ये दुधाची चांगली मागणी तसेच दुधापासून मिळणाऱ्या विविध पदार्थांची ही चांगली मागणी असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या भागांमध्ये डेअरी फार्मिंग प्रकल्प (Dairy Project) करत आहात त्या भागांमध्ये जनावरांच्या डॉक्टरची (Veterinary Doctor) सोय असणे तसेच त्यांचे औषध यांची उपलब्ध असणे गरजेचे आहे.

प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता (Economical Viability of Dairy Project)

प्रकल्पामध्ये येणारे विविध खर्च जे आपण कोटेशन्स (Quotations) मध्ये किंवा आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सादर केलेले आहेत ते जस्टिफाइड असावेत. दुधापासून मिळणारे उत्पन्न हेही रियलिस्टिक असले पाहिजे विनाकारण दुधाची किंमत किंवा दुधाच्या प्रोडक्टची किंमत वाढवून दाखवू नये (Show realistic income in Project Report). आपल्या प्रोजेक्टमध्ये हिरवा चारा कोरडा चारा किंवा पेंड किंवा इतर छोटे मोठे खर्च याची योग्य किमतीने योग्य प्रमाणात दर्शवली पाहिजे. प्रकल्पाचे उत्पन्न गृहीत धरताना दुधापासून मिळणारे उत्पन्न तसेच शेणखत पासून मिळणारे उत्पन्न तसेच गाई आणि जनावरांचे होणारी वासरे (calf), ही वासरे मोठी झाल्यावर ते विकून होणारे उत्पन्न या गोष्टीही याच्यामध्ये गृहीत धरणे महत्त्वाचे असते.

बँका कमीत कमी दोन जनावरे खरेदी करण्यासाठी लोन (mini dairy loan) देत असतात दोन पेक्षा कमी जनावरे खरेदी करण्यासाठी बँका सहसा लोन देत नाहीत कारण एक जनावरासाठी हा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नाही किंवा जर आपल्याकडे आधीच एखादे दुभते जनावर असेल तर आपल्याला बँक एका जनावरासाठी कर्ज देऊ शकते. आपल्याला डेअरीचा छोटा प्रोजेक्ट (mini dairy project loan) करायचा असेल तर बँक चार ते दहा जनावरांपर्यंत आपल्याला आपला प्रोजेक्ट. आपल्याला जर दहा जनावरांपेक्षा जास्त जनावरांचा प्रोजेक्ट करायचा असेल तर हा प्रोजेक्ट बँका कमर्शियल प्रोजेक्ट (Commercial Dairy Project) म्हणून गृहीत धरतात तर यासाठी कमर्शिअल प्रोजेक्टसाठी असणारे सर्व नियम लागू असतात.

जनावरांची निवड करताना (Selection of animals for Dairy Farming)

जनावरांची निवड करताना काही खास बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. उत्तम प्रकारच्या दुभत्या जनावरांची निवड आपल्याला करता आली पाहिजे. दुभती जनावरे खरेदी करताना कधीही पहिल्या किंवा दुसऱ्या वेताचे जनावर खरेदी करावे. तिसऱ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेत असणारे जनावर खरेदी करण्यापासून टाळावे. दुधाची सरासरी ठरवताना दिवसाला सकाळ आणि संध्याकाळचे दूध मिळून कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त 40 लिटर प्रति दिवस दूध देणारे जनावर खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. जनावर खरेदी करताना त्यांचं वय अडीच ते साडेचार वर्ष असावे.

जनावर खरेदी करताना त्यांचे दात बघून जनावर खरेदी करत असतात तर त्यामध्ये त्या दातांची एक ते तीन दातांच्या जोड्या असलेले जनावरे उत्तम असतात. साधारणतः गाईचे इकॉनॉमिक आयुष्य (economic life of cow) हे दहा वर्ष किंवा सहा वेत आणि म्हैस चे (economic life of buffalos) 11 ते 12 वर्ष किंवा सात वेत अशा प्रकारचे असते त्यामुळे जनावर खरेदी करताना या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.

गोठा बांधताना काय काळजी (Construction of Cattle shed for Dairy Farming)

गोठा बांधताना ज्या ठिकाणी गोठा बांधत आहात ती जागा बऱ्यापैकी उंच असावी किंवा आपण भराव टाकून त्या जागेची उंची आजूबाजूच्या जागेपेक्षा वाढवावी. गोठ्याला सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारचे व्हेंटिलेशन (ventilation) असावे जेणेकरून गोठ्यामध्ये उत्तम प्रकारे हवा खेळती राहील तसेच आपण जेव्हा गोठ्याचा फ्लोअर/फरशी करताना तो इतकाही स्लीपरी किंवा गुळगुळी ठेवू नये जेणेकरून जनावरांना त्यावर उभा राहणे अवघड जाईल.

गोठ्याच्या भिंती साधारण पाच ते सहा फुटाच्या असाव्यात आणि छताची उंची 10 ते 13 फुटापर्यंत करावी आणि मी व वर सांगितल्याप्रमाणे एका जनावराला कमीत कमी 40 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध होईल याप्रमाणे आपल्या गोठ्याचे नियोजन करावे तसेच यासोबत छोटे वासरू असतात त्यांच्यासाठीही कमीत कमी बारा ते वीस स्क्वेअर फुट प्रति वासरू एवढ्या जागेची उपलब्ध असणे गरजेचे असते.

जनावराचा गोठा बांधताना यामध्ये दोन पद्धती असतात जनावरांच्या बांधायच्या दोन ओळी असतात त्यामध्ये जनावरांची तोंड एकमेकांसमोर (Head to Head Housing System) असणे अशी एक पद्धत आणि जनावरांची शेपटी एकमेकांसमोर असेल (Tail to Tail Housing System) अशी दुसरी पद्धत दोन्ही पद्धतीमध्ये आपण हा गोठा तयार करू शकता पण हा गोठा या पद्धतीमध्ये करताना एक गोष्ट काळजी घेणे गरजेचे आहे जी की मजुरांना जनावरांचे मलमूत्र आणि शेण काढताना पुरेशी जागा उपलब्ध असावी. आपण गोबर गॅस चा प्लांट करणार असाल तर आपल्या गोठ्यातून निघणाऱ्या सांडपाण्याच्या गटार मधून गोबर गॅसच्या प्लांटला आपण थेट कनेक्शन देऊ शकता.

जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे नियोजन (Fodder Management)

दुभत्या जनावराला प्रति दिवस प्रति जनावर 25 किलोग्रॅम हिरवा चारा लागत असतो तसेच भाकड काळात जनावरांना सुद्धा प्रति दिवस प्रति जनावर 25 किलो हिरवा चारा लागत असतो, दुभत्या आणि भाकड या दोन्ही जनावरांना कोरड चारा प्रती जनावर प्रति दिवस पाच किलो इतका लागत असतो तसेच यामध्ये आपण देणारे Concentrate म्हणजेच आपण जे पेंड देतात हे दुभत्या जनावरांसाठी प्रति दिवस चार ते पाच किलो द्यावी आणि कोरड्या जनावरासाठी एक किलो देणे गरजेचे आहे.

गोठ्यामध्ये काळजी घेण्यासारख्या मुद्दे (Important point in Cattle shed Maintenance)

Important point in Cattle shed Maintenance
  • जनावरांची धार काढताना साधारण दिवसातून दोन वेळेस धार काढणे गरजेचे असते.
  • धार काढताना मिल्किंग मशीन ने किंवा हाताने जरी धार काढत असला तरीही सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण धार काढून होणे गरजेचे असते.
  • साधारणपणे असा प्रयत्न करा की रोज त्याच व्यक्तीने त्या जनावरांची धार काढावी.
  • धार काढण्यापूर्वी जनावरांची कास योग्य पद्धतीने धुवून घेणे.
  • जे जनावर आजारी आहे त्या जनावराची धार सर्वात शेवटी काढावी.
  • दररोजच्या दुधाचे रेकॉर्ड आपण योग्य पद्धतीने नोंद करणे गरजेचे आहे.
  • वर सांगितलेली सर्व माहिती बहुतेक सर्व शेतकऱ्यांना माहीत असते तरीही आपण प्रोजेक्ट करताना या सर्व गोष्टींची काळजी करून या गोष्टी नियमित पाळाव्यात तरच आपला प्रोजेक्ट यशस्वी होईल.

डेअरी कर्ज योजनेअंतर्गत कश्या कश्यासाठी कर्ज मिळू शकते (Purpose of Dairy Farming Loan)

डेअरी फार्मिंग लोन (Dairy Farming Loan) मध्ये फक्त गाय किंवा म्हैस ह्या खरेदी करण्यासाठीच लोन मिळते असे नाही तर दुग्ध व्यवसायाशी निगडित प्रत्येक गोष्टीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला डेअरी फार्मिंग लोनच म्हणतात. डेअरी फार्मिंग लोन अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोनची यादी मी खाली दिलेली आहे.

  • उच्च प्रतीच्या दूध देणाऱ्या गाई व म्हैस खरेदी करण्यासाठी.
  • दूध दुभत्या जनावरांसाठी गोठा बांधणे (Construction of Cattle Shed) किंवा आहे त्या गोठ्याची दुरुस्ती (Repair of Cattle Shed) करणे तसेच आहे तो गोठा मोठा करणे किंवा अद्ययावत करणे.
  • दुधाच्या प्रोसेसिंग मध्ये लागणारे विविध मशनरी (Milk Processing Machinery) खरेदी करण्यासाठी जसे क्रीम सेपरेटर (Cream Separator), फॅट टेस्टिंग मशीन (Fat Testing Machine), दूध साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भांडी, दूध मापण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मापे, जनावरांना दिला जाणारा चारा यांची कटिंग करण्यासाठी चाफ कटर.
  • डेअरी फार्मिंग लोन करताना त्यामध्ये पेंड खरेदी करण्यासाठी, चारा खरेदी करण्यासाठी, औषधे खरी खरेदी करण्यासाठी‌ खेळते भांडवल (Working Capital).
  • दूध संकलन (Milk Collection) तसेच त्या दुधावर प्रोसेसिंग तसेच त्या दुधाचे वितरण, दुधापासून विविध बाय प्रॉडक्ट तयार करण्यासाठी लागणारे विविध मशिनरी किंवा याच्यावर आधारित विविध उद्योग.
  • सुधारित पद्धतीने दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन (Milking Machine), दुधाचे वितरण करण्यासाठी बॉटल्स, दुधाचे पॅकिंग (Milk Packaging Machine) करण्यासाठी पॉलिथिन फूड ग्रेड बॅग्स आणि त्या पॅक करण्यासाठी त्याला लागणाऱ्या विविध मशीनरी.
  • यासोबतच या गोठ्यांवर संबंधित असणारे विविध ऍक्टिव्हिटी जसे की गोबर गॅस प्लांट किंवा शेणखत किंवा गांडूळ खत तयार करण्यासाठीही लोन मिळू शकते.

पात्रता (Eligibility for Dairy Farming Loan)

  • अठरा वर्षे पूर्ण असणारा कोणताही भारतीय व्यक्ती डेअरी फार्मिंग लोन साठी पात्र आहे. 
  • शेती असणारे आणि शेती नसणारे हे दोन्ही प्रकारचे शेतकरी पात्र आहेत..
  • आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डेअरी फार्मिंगच्या कमर्शियल प्रोजेक्ट करायचा असेल तर आपल्याला या व्यवसायाचा उत्तम अनुभव असणे आवश्यक आहे.
  • डेअरी फार्मिंग साठी दूध संस्था तसेच बचत गट हे सुद्धा पात्र आहेत.

कर्ज रक्कम (Loan Amount)

डेअरी फार्मिंग लोन (Dairy Loan) घेताना शेतकऱ्यांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या प्रोजेक्टसाठी किती लोन मिळेल. दुग्ध व्यवसायासाठी आपल्याला आपल्या प्रकल्प खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते आणि यामध्ये विविध वस्तूंचा प्रोजेक्ट कॉस्टचा उल्लेख असला पाहिजे आणि या वस्तूंचे दर नाबार्डने दिलेल्या मार्गदर्शक किमतीनुसार असले पाहिजेत किंवा आपण मार्केटमध्ये सरासरी जे दर आहेत त्याप्रमाणे दर गृहीत धरू शकतात. प्रकल्पासाठी वेगवेगळ्या वस्तू मशनरी आणि लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू यांचे जे दर लावलेले आहेत ते हेतूपुरस्पर जास्तीचे लावले नाहीत ना याची बँक पडताळणी करत असते. या प्रकल्प खर्चामध्ये आपल्याला लागणारा साधारण एक महिन्यापर्यंत लागणारे खेळते भांडवल आपल्याला कर्ज स्वरूपात मिळू शकते.

मार्जिन रक्कम (Margin Money)

डेअरी फार्मिंग लोन साठी आपल्याला स्व:गुंतवणूक म्हणजेच मार्जिन मनी कमीत कमी १०% आवश्यक आहे.

कर्ज वितरण (Loan Disbursement)

आपल्याला डेअरी फार्मिंग लोन मंजूर झाल्याच्या नंतर आपण ज्यांच्याकडून जनावर खरेदी करणार आहात, मिल्किंग मशीन खरेदी करणार आहात, शेड ज्यांच्याकडून बांधून घेणार आहात, विविध वस्तू आपण त्यांच्याकडून खरेदी करणारा आहात त्यांना त्यांच्या बँक खात्यावर आपली बँक थेट रक्कम जमा करते. रक्कम पाठवताना कर्ज व मार्जिन मनी असे एकत्र रक्कम ट्रान्सफर होत असते. कुठलाही खर्च आपल्याला आपल्या खात्यावर जमा मिळत नाही.

बहुतेक वेळी शेतकरी कर्जाची फाईल बँकेत दिल्यानंतर खर्च करण्यास सुरू करतात जसे की शेडचा बेस बनवणे शेड बनवणे आणि त्यानंतर बँकांमध्ये जाऊन सांगतात की आम्ही हा खर्च केलेला आहे आणि याची पैसे आम्हाला आमच्या बचत खात्यावर मिळावे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचा खर्च जरी आपण केलेला असेल तर बँक ती आपल्याला आपल्या खात्यावर देऊ शकत नाही त्यामुळे आपण त्या त्या व्यक्तीकडून काम करून घेऊन त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावे.

आपले कर्ज मंजूर झाल्याच्या नंतर संपूर्ण कर्ज एकत्र पाठवले जात नसते, आपण ज्याप्रमाणे प्रोजेक्ट पूर्ण करतात त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या खर्चाचे पेमेंट केले जाते (Step by Step disbursement) जसे की सर्वात प्रथम आपण आपल्या गोठ्याचा बेस तयार केला तर त्याचे पैसे पेमेंट करणार त्यानंतर बँकेच्या अधिकारी त्याचे येऊन वेरिफिकेशन करणार त्यानंतर पुढील शेड बनवण्यासाठी पैसे वितरित करणार त्यानंतर ते शेड बांधकाम झाल्याच्या नंतर परत बँकेच्या अधिकारी वेरिफिकेशन ला येणार आणि त्याच्या पुढचा हप्ता वितरित करणार अशाप्रमाणे टप्प्याटप्प्याने बँक कर्ज वितरण करत असते.

आपण जर दोन जनावरांपेक्षा जास्त जनावरांचा जर प्रोजेक्ट केलेला असेल तर आपल्याला सर्व जनावरे खरेदी करण्यासाठी एकदाच कर्ज वितरण केले जात नाही कारण आपले कर्जाचा हप्ता वर्षभर सुरू असतो परंतु जनावरांचा दूध देण्याचा कालावधी वर्षभर सुरू नसतो त्यामुळे आपण समजा दहा जनावरांचा प्रकल्प केला असेल तर पाच जनावरे खरेदी करण्यासाठी सुरुवातीला कर्ज वितरण केले जाते आणि उरलेल्या पाच जनावरांसाठी पहिल्या जनावरांच्या भाकड काळ जवळ येत असताना दुसऱ्या पाच जनावरांसाठी कर्ज वितरित केले जाते जेणेकरून आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत कायम राहील आणि त्याद्वारे आपण बँकेच्या कर्जाची परतफेड योग्यरीत्या करू शकतो.

आपण बँकेच्या कर्जामधून जो काही खर्च करून पूर्ण गोठा बांधलेला आहे काही मशिनरी वस्तू खरेदी केलेले आहेत तसेच जनावर खरेदी केलेले आहेत तर या सर्वांची बिले पक्की किंवा कच्ची बँकेला वेळेवर सादर करणे गरजेचे आहे.

बहुतेक शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना असा प्रश्न पडतो की आम्ही आमच्या गावातून एका दुसऱ्या शेतकऱ्याकडून गाय किंवा म्हैस खरेदी केलेली आहे तर अशा स्थितीमध्ये बँकेला बिल कसे द्यावे तर मी सोबत अशा खरेदीसाठी उपयोगी अशा पावतीचा एक फॉरमॅट जोडलेला आहे, आपण तो फॉरमॅट वाचू शकता आणि तशाप्रकारे आपण कच्ची पावती तयार करून बँकेला सादर करू शकता अशी पावती बँक स्वीकारते.

परतफेड कालावधी (Repayment Period)

डेअरी फार्मिंग लोन मध्ये परतफेडीचा कालावधी हा आपल्या प्रोजेक्टच्या रकमेवर किंवा आपण किती जनावरे खरेदी करणार आहात यावर अवलंबून असतो जसे की आपण छोट्या प्रमाणात प्रोजेक्ट करत असाल म्हणजेच दोन किंवा तीन किंवा चार जनावरे करत असतात तर आपल्याला जास्तीत जास्त 36 महिने म्हणजेच तीन वर्षापर्यंत आपल्याला परतफेड कालावधी मिळू शकतो आणि त्यापेक्षा जास्त जनावरांचा जर आपला प्रोजेक्ट असेल तर आपल्याला सात वर्षे म्हणजेच 84 महिन्यापर्यंत परतफेड कालावधी मिळू शकतो. जर आपला प्रकल्प कमर्शियल प्रकल्प असेल तर त्या प्रकल्पाच्या अनुरूप यामध्ये परतफेड कालावधी दिलेला असतो यामध्ये प्रकल्प यामध्ये परतफेड कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार बँकेला असू शकतो.

तारण (Security)

कर्ज म्हटल्यानंतर ग्राहकांच्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की या कर्जासाठी तारण म्हणून काय द्यावे लागेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रिझर्व बँकेच्या नियमानुसार बहुतेक सर्व बँका रु. १,६०,०००/- पर्यंत कुठलेही वेगळे तारण घेत नाहीत आपण बँकेच्या कर्जामधून जे जनावर खरेदी केलेले आहेत तेच बँकेकडे तारण म्हणून दिलेली असते.

ज्यांचे लोन रु. १,६०,०००/- पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आपली शेती तारण (Declaration of Charge म्हणजेच बोजा नोंद करणे) देऊ शकता किंवा ज्यांच्याकडे शेती नसेल आणि ते जे आपला गोठा आहे ज्या जागेवर बांधत आहे ती जागा त्यांच्या कर्जासाठी तारण देऊ शकतात किंवा ते गोठा जर भाड्याच्या जागेवर करत असतील तर त्यांची दुसरी तारण मालमत्ता किंवा फिक्स डिपॉझिट या गोष्टी बँकेला तारण म्हणून देऊ.

बहुतेक जणांना असा प्रश्न असतो की उद्योग कर्जामध्ये CGTMSE मार्फत कर्जाला गॅरंटी मिळत असते तशी गॅरंटी दूध व्यवसायाच्या कर्जाला मिळते का तर कशी गॅरंटी दूध व्यवसायाच्या कर्जाला मिळत नाही कारण CGTMSE  मधून मिळणारी क्रेडिट गॅरंटी ही फक्त सूक्ष्म मध्यम आणि लहान उद्योगांसाठी आहे जे की शेतीशी संबंधित नाहीत त्यामुळे आपल्याला रु. १,६०,०००/- वरच्या प्रत्येक कर्जासाठी वेगळे तारण द्यावे लागेल.

जनावरांचा विमा (Insurance of Animals)

आपण डेअरी फार्मिंग लोन (Dairy loan scheme) अंतर्गत जे जनावर घेणार आहात तर त्या सर्व जनावरांचा विमा करणे बंधनकारक असते तसेच आपण जो गोठा बांधलेला आहे किंवा आपण जी मशनरी घेतलेली आहे त्या सर्वांचा विमा करणे गरजेचे आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याकडे त्याच गोठ्यामध्ये पूर्वीची काही जनावरे असतील आणि आपण नवीन जनावरे त्याच गोठ्यामध्ये बांधणारा असाल तर आपल्याला पूर्वीची जनावरे आणि नवीन जनावरे या सर्वांचा विमा करावा लागेल म्हणजेच आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या सर्व जनावरांचा विमा आपल्याकडे असणे गरजेचे आहे या विम्यासाठी साधारण जनावरांच्या खरेदी किमतीच्या प्रतिवर्ष ५% एवढा विमा खर्च येतो या विम्यामध्ये जनावरांचा मृत्यू आणि भाकड म्हणजेच जनावर कदाचित भाकड निघाले तर तशा प्रकारचा पण विमा याच्यामध्ये मिळू शकतो फक्त विमा करताना या गोष्टी दोन्ही गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत का नाही याचा विमा करताना नक्की खात्री करावी.

डेअरी फार्मिंग लोन साठी लागणारी कागदपत्रे (Documents required for Dairy Farming Loan)

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. रेशन कार्ड
  4. आपले विज बिल
  5. शेती असेल तर शेतीचा सातबारा आणि आठ उतारा 
  6. आपण ज्या ठिकाणी गोठा बांधणार आहात त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा किंवा आपण जर भाड्याच्या जागेमध्ये गोठा करणारा असाल तर त्याचा भाडेकरार, हा भाडेकरार लोनचा परतफेड कालावधी जेवढा आहे तेवढ्या कालावधीचा भाडेकरार असणे गरजेचे आहे.
  7. आपल्या गोठ्यासाठी करणारे विविध खर्च आणि खरेदी करणाऱ्या विविध वस्तू या सर्वांचे कोटेशन असणे गरजेचे आहे. यामध्ये महत्त्वाचे आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे सर्व कोटेशन जीएसटीचे असतील असणे गरजेचे आहे का नाही तर मी आपल्याला सांगू इच्छितो जीएसटी असणे किंवा नसणे हा त्या त्या व्यापाऱ्याचा प्रश्न आहे जो व्यापारी जीएसटी ला पात्र असेल त्याचे बिल जीएसटी असलेले असते आणि जो व्यापारी पात्र नाहीये त्याचे बिल जीएसटी नसते त्यामुळे ते बिल जीएसटी असावे किंवा नसावे हा वस्तू खरेदी करण्याचा विषय नसतो त्यामुळे आपण याच्याबद्दल बँकेलाही आणि स्वतःही विचारणा करत बसू नये.
  8. आपल्याला होणारे इतर खर्च म्हणजेच हिरवा चारा, कोरडा चारा, पेंड. 
  9. आपल्याला मजूर लागणार असतील तर त्यांचा पगारीचा खर्च हा सर्व गोष्टीचा अंतर्भाव आपल्या प्रोजेक्टमध्ये करावा आणि त्याचे रीतसर कोटेशन कर्ज प्रकरणासोबत द्यावेत.

व्याजदर (Rate of Interest)

डेअरी फार्मिंग लोन (Dairy Farming Loan) हे कृषी कर्जामध्ये मोडते त्यामुळे या कर्जाला सरळव्याज लागत असते आणि या सर्व व्याजामध्ये सरासरी सर्व बँकांमध्ये सध्या १०% ते ११.५०% व्याजदर आहेत. हे व्याजदर थोड्याफार फरकाने कमी-जास्त असू शकतात.

शासकीय योजना (Credit Linked Government Subsidy Schemes)

डेअरी फार्मिंग साठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत यामध्ये विविध योजनांमध्ये आपल्याला ठराविक रक्कम सबसिडी म्हणून मिळत असते किंवा काही मध्ये व्याजाचा परतावा मिळू शकतो काही योजनांची यादी मी खाली दिलेली आहे.

आपल्याला जर वरीलपैकी कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो आपण त्या शासकीय कार्यालयाशी किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून आपण त्याचा लाभ घेऊ शकता बँक स्वतःहून आपल्याला या योजनेसाठी कुठल्याही योजनेसाठी स्वतःहून अर्ज करत नसते बँकेकडून आपल्याला कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता लागल्यास बँक आपल्याला ते कागदपत्र पुरवत असते परंतु आपण बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची जबाबदारी आपल्याला शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देणे असते असे समजू नये.

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

2 thoughts on “दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती (Dairy Farming Loan Information in Marathi)

  • अशोक चांगदेव शिंदे

    गाय खरेदी साठी लोन

    Reply
    • आपण आपल्या जवळच्या बँकेत जिथे आपले बचत खाते आहे आणि आपण जेथे नियमित व्यवहार करतात त्या बँकेत गाय खरेदी करण्यासाठी कर्जासाठी अर्ज करू शकता. रु. १६००००/- पर्यंत आपल्याला कर्जासाठी कुठलेही स्थावर मालमत्ता तारण द्यायची आवश्यकता नाही. त्यावरील कर्जासाठी शेती किंवा घर तारण द्यावे लागेल.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *